‘मालकांच्या उत्तर’साठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ; कार्यकर्त्यांच्या पसंतीचे नाव लिफाफ्यात बंद
सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यकर्त्यांमधून पसंतीच्या उमेदवारासाठी शुक्रवारी मतदान झाले. मालकांच्या उत्तरसाठी मतदान करताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. 113 मतदारांपैकी 112 मतदान झाल्याची माहिती शहर अध्यक्ष यांच्याकडून मिळाली. उत्तर मध्ये कार्यकर्ते बंडाच्या तयारीत असल्याने यावेळी कार्यकर्ते आपापल्या गटात पाहायला मिळाले. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख हे पूर्णवेळ ठाण मांडून असल्याचे दिसून आले.
अक्कलकोट विधानसभा दक्षिण सोलापूर विधानसभा आणि शहर मध्य या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांचे मतदान झाल्यानंतर सर्वांचे लक्ष शहर उत्तर याकडे लागले होते.
भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हे मतदान घेण्यात आले. शहर उत्तर विधानसभेसाठी यंदा भारतीय जनता पार्टी कडून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात अनेक जण इच्छुक झाले आहेत.
विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात माजी सभागृह नेते सुरेश पाटील, माजी महापौर शोभा बनशेट्टी, चनवीर चिट्टे, जगदीश पाटील यांनी एकजूट केली आहे. या मतदानाच्या वेळेस सुरेश पाटील, चन्नवीर चिट्टे हे दोन्ही नेते शेजारच्या रूम मध्ये बसले होते.
शासकीय विश्रामगृहावर निरीक्षक मकरंद देशपांडे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, ज्येष्ठ नेते पांडुरंग दिंडी, रोहिणी तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवातीला बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत मतदान पद्धतीची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मतदान घेण्यात आले. या मतदानावेळी मालकांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला.