विजय अन् दिलीपमालकांच्या उपस्थितीत जयकुमारांचा हिरवा झेंडा ; दादा होते साक्षीला
सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख समर्थक सोमनाथ रकबले यांच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त शेळगी परिसरातील नागरिकांना प्रयागराज, काशी, अयोध्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सुमारे 1470 नागरिकांसाठी संपूर्ण रेल्वे बुक करण्यात आली होती.
या यात्रा शुभारंभाच्या सोहळ्याला आमदार विजयकुमार देशमुख यांनी आवर्जून जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रित केले होते. या सोहळ्याला रकबले यांनी माजी आमदार तथा बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते.
या यात्रा शुभारंभ सोहळ्याचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नियोजन केले होते. एवढा एका कार्यक्रमासाठी पालकमंत्र्यांनी आपला सोलापूर दौरा केला. गाडीची वेळ सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांची होती पालकमंत्री पाच वाजून 40 मिनिटांनी रेल्वे स्टेशन मध्ये आले. विजयकुमार देशमुख यांनी गेटवरच त्यांचे स्वागत केले. आत मध्ये दिलीप मालक थांबून होते.
पालकमंत्र्यांच्या पाठोपाठ आमदार देवेंद्र कोठे आले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना येण्यासाठी थोडासा वेळ होता त्यामुळे सर्व नेत्यांनी बराच वेळ वेटिंग केला. पण सचिन दादांना अक्कलकोटचा कार्यक्रम उरकून येण्यासाठी उशीर होत असल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेवटी आमदार विजय मालक आणि माजी आमदार दिलीप मालक यांच्या उपस्थितीत आमदार देवेंद्र दादा यांच्या साक्षीने आयोध्याला जाणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
सुमारे दीड हजार सोलापूरकर या रेल्वेने अयोध्येला निघाले. रेल्वे निघताना प्रत्येकाच्या तोंडातून जय श्रीराम चा नारा ऐकण्यास मिळाला. झेंडा दाखवण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी रेल्वेतील नागरिकांशी संवाद साधला. या उपक्रमाचे नंतर त्यांनी मीडियाशी बोलताना प्रचंड कौतुक केले. त्यावेळी सचिन दादा जॉईन झाले.