सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवेळी आलेल्या पावसामुळे द्राक्ष बाग, काढायला आलेल्या तुरी तसेच नुकतेच पेरलेल्या ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी मंडल भागात पडला आहे.
एकीकडे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या मतदारसंघातील बोरामणी भागात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकर्यांना धीर देत, प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. या नागरिकांना शासनामार्फत शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
त्यांच्यासोबतच प्रांत अधिकारी विठ्ठल उदमले आणि तहसीलदार किरण जमदाडे यांनीही कासेगाव भागातील नुकसान झालेल्या द्राक्ष बागा व इतर पिकांची पाहणी केली.