उमेश पाटील यांचा राजीनामा मंजूर ; तुतारी कडे जाण्याचा मार्ग झाला मोकळा
सोलापूर : अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिलेला राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंजूर केला आहे तसे पत्र उमेश पाटील यांना राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडून आले आहे. यामुळे आता उमेश पाटील यांचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे झालेल्या आपर तहसील कार्यालयाचे पेटलेले राजकारण उमेश पाटील यांच्या राजीनाम्या पर्यंत आले आहे.
तहसील कार्यालयाच्या प्रकरणावरून अजित पवार यांनी उमेश पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या उमेश पाटील यांनी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला. तो राजीनामा आता मंजूर झालेला आहे.
दरम्यानच्या काळात उमेश पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तशी भेट ही पवार यांच्याशी झाली होती. आता या राजीनामा मंजुरीनंतर उमेश पाटील हे साहेबांच्या राष्ट्रवादीत कधी प्रवेश करणार याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान आमदार यशवंत माने यांच्या विरोधात मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजू खरे की संजय क्षीरसागर या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.