आषाढी एकादशीत यंदा वारकऱ्यांना मिळणार या खास सुविधा ; अजित पवारांच्या आढावा बैठकीला सर्व आमदारांसह जिल्हा प्रशासनाची हजेरी
पुणे दि. १४: आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२४ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, संजय जगताप, दत्तात्रय भरणे, समाधान आवताडे, बबनदादा शिंदे,संजय शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा, नियुक्त करण्यात आलेले आरोग्यदूत, घटना प्रतिसाद प्रणाली, आपत्ती व्यवस्थापन व मदत केंद्र याबाबत नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार दर्शन बारीमधील प्रत्येक वारकऱ्याला एक लिटर पाण्याची बाटली व लिंबू पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पंढरपूर शहर व परिसरात स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छ वारी, निर्मल वारीच्यादृष्टीने सर्व नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले. बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा, श्री संत निळोबाराय संस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.