सोलापूर – बोरामणी येथील अनिता योगेश माळगे आणि अन्य शेतकरी महिला व कंपनीचे सदस्य येत्या शुक्रवारी (ता.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेट पदार्थांची खास भेट देणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी भरडधान्याचे (मिलेट) महत्त्व ओळखून त्या उत्पादनांना आणि प्रक्रिया पदार्थांना चालना व गती देण्याचे ठरवले आहे. सोलापूर जिल्हा भरडधान्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे उत्कृष्टता केंद्र सोलापूरातच राहणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधानांनी घोषणा केल्यास या संदर्भात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला विराम मिळणार आहे.
भरडधान्य उत्पादनात जिल्ह्यातील शेतकरी व शेतकरी कंपनी यांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे या केंद्राची गरज सर्वार्थाने आहे. त्याबद्दल सर्व शेतकरी व कंपनीतर्फे पंतप्रधान मोदी यांना निवेदन देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या यशस्विनी कंपनीचे अध्यक्षा सौ. अनिता माळगे यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी नवीदिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता.
त्याचप्रमाणे दिल्लीत झालेल्या जी-२० शिखर परिषदेत इटलीचे पंतप्रधान मिस जॉर्जिया मेलोनी व ब्रिटनचे पंतप्रधान यांचे पत्नी मिस अक्षता मूर्ती, परराष्ट्र मंत्री यांचे पत्नी मिस जयशंकर आणि जागतिक बँकेचे CEO अजित बंगा यांच्या विशेष सत्काराचा मान महाराष्ट्र राज्याच्या वतीने अनिता माळगे यांना देण्यात आला होता.
श्री. मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त सोलापूरच्या भरडधान्यापासून केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची भेट महिला व शेतकरी यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.
श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच
सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी कंपन्या, शेतकरी बचतगट आणि शेतकऱ्यांसाठी श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच राहणे गरजेचे आहे. ते इथेच राहिल, अशी घोषणा सोलापुरातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी करतील, अशी अपेक्षा सर्व शेतकरी महिलांनी व्यक्त केली आहे.