सोलापूर : यंदा प्रमाणा पेक्षा कमी पाऊस झाल्याने येणारा उन्हाळा अतिशय त्रासदायक जाणार आहे. उजनी धरण केवळ 60 टक्के भरल्याने आणि सध्याची पाणी पातळी केवळ 25% च्या आत असल्याने आतापासूनच पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.
परंतु सोलापूर शहरांमध्ये ‘दुष्काळात तेरावा महिना’ असेच म्हणणे भाग पडले आहे त्याला कारण ही तसेच असून सोलापूर महापालिकेचे कर्मचारी इतके बेजबाबदार कसे असा प्रश्न हे चित्र पाहून कोणीही उपस्थित करेल.
गांधीनगर परिसरात पोलीस आयुक्तालयाच्या समोर असलेली महानगरपालिकेची मोठी पाण्याची टाकी ओव्हर फ्लो होऊन बराच वेळ त्यातून पाणी बाहेर वाहत होते. लाखो लिटर पाणी तसेच वाया गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. टाकीतले पाणी सरळ रस्त्यावर येऊन वाहत होते, हे पाणी गांधीनगर कडे तसेच उताराने सदर बाजार पोलीस ठाण्याकडे आणि इकडे होडगी रोडला वाहत होते. तरीही त्याचे गांभीर्य कुणाला नसल्याचे दिसून आले. जेव्हा ही बाब काही पत्रकारांना कळाले तेव्हा अनेकांनी त्याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले.
एकीकडे पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे असताना दुसरीकडे मात्र महापालिकेला आहे त्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करता येत नाही हे प्रशासनाचे दुर्दैव म्हणावे लागेल.