सोलापूर ‘शहर उत्तर’मध्ये या ‘भावी आमदार’च्या पोस्टरची सर्वत्र चर्चा
सोलापूर : काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या सर्व विधानसभा मतदारसंघात मतदारांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता मिळावे घेतले आहेत. सोलापूर शहर उत्तर आणि शहर मध्य या दोन्ही मतदारसंघाचा एकत्रित कृतज्ञता मिळावा रविवारी अक्कलकोट रोड वरील बोमड्याल मंगल कार्यालयात घेण्यात आला. हा मेळावा नव्हता तर विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांची भाऊ गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
परंतु या मेळाव्याच्या दोन दिवस अगोदर झालेल्या नियोजन बैठकीत कार्यकर्त्यांनी शहर उत्तर काँग्रेसकडे घेण्यासाठी जोर धरल्याचे सांगण्यात आले. उत्तर हा मतदारसंघ पारंपारिक काँग्रेसचा आहे जोर लावला तर पुन्हा तो आपल्या ताब्यात मिळू शकेल. त्यासाठी महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ काँग्रेसला घ्यावा अशी मागणी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी सभापती सुनील रसाळे, माजी सेवादल अध्यक्ष अशोक कलशेट्टी, काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते तसेच नागनाथ कदम यांनी शहराध्यक्ष नरोटे यांच्याकडे केली होती.
या मेळाव्यासाठी शहर उत्तर मध्ये सुदीप चाकोते यांनी प्रत्येक चौका चौकात पोस्टर लावून या कार्यक्रमाची वातावरण निर्मिती केल्याचे पाहायला मिळाले. त्यावर सुदीप चाकोते यांच्या फोटो खाली भावी आमदार असे लिहिल्याने ते दोन शब्द राजकीय वर्तुळात चर्चेचे ठरत आहेत. लिंगायत समाजातील युवा चेहरा, स्वतःच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेले कार्य, सेवा दल यंग ब्रिगेड च्या माध्यमातून युवकांचे बांधलेली फळी आहे सुदीप यांच्यासाठी प्लस पॉईंट मानले जातात. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत असलेले चांगले संबंध आणि राष्ट्रीय पातळीवर असलेली चाकोते यांची ओळख त्यांना भविष्यात फायदेशीर ठरणारे असेल हे मात्र नक्की.