सोलापुरातल्या या युवराजाचे महत्त्व वाढले ! आ.सुभाष देशमुख, आ. राजेश राठोड नंतर उमेदवार राम सातपुते भेटीला
सोलापूर : सोलापुरातील उद्योजक सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अतिशय महत्त्व वाढल्याचे दिसत आहे. या युवा नेत्याची तब्बल तीन आमदारांनी भेट घेतल्याने याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
युवराज राठोड हे उद्योजक आहेत, त्यांचे आधार हॉस्पिटल आहे, तसेच सोनाई फाउंडेशन मार्फत ते विविध सामाजिक कार्य करत असतात. दक्षिण सोलापूर तालुका, जुळे सोलापूर भाग, सैफुल भाग यामध्ये यांची चांगली ओळख आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये युवराज राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केले नाही. ते सध्या अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांची भेट घेऊन सक्रिय व्हा अशी मागणी केली होती. लगेच दोन दिवसानंतर जालन्याचे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांनीही युवराज यांची भेट घेतली. त्यामुळे आता युवराज आपली राजकीय भूमिका कधी स्पष्ट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
त्याच रात्री म्हणजे शनिवारी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनीही युवराज राठोड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यामुळे आता चर्चेला अधिकच ऊत आला आहे. मागील आठ दिवसात तब्बल तीन आमदारांनी राठोड यांचे भेट घेतल्यामुळे या युवराजाचे महत्त्व अधिकच वाढले असून ते सोमवारी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जात आहे.