दहा हजाराची लाच घेताना सहकारी संस्थांचा उप लेखा परीक्षक सापडला !
सोलापूर : दक्षिण सोलापुरातील बोरामणी येथील मजूर सोसायटीबाबत केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी सोसायटीच्या बाजूने अहवाल देण्यासाठी 30 हजार लाचेची मागणी करून पहिला हप्ता दहा हजार रुपये स्वीकारताना सहकारी संस्था वर्ग 3 च्या कार्यालयातील उपलेखापाल शिवाजी उंबरजे (वय – 57, रा. यशवंत हाऊसिंग सोसायटी कुमठा नाका) याला लाच लुचपत प्रतिबंधक पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली.
याबाबत बोरामणी येथील विलासराव देशमुख मजूर सहकारी संस्थेच्या चेअरमनने तक्रार केली होती. या चेअरमनच्या मधुर संस्थेविरुद्ध त्यांच्या पत्नीने सहकार संस्थांच्या सहाय्यक निबंधकांकडे तक्रार केली होती.
या तक्रारीवरून सहाय्यक निबंधकांनी संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या संस्थेची चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी उपलेखा परीक्षक उंबरजे यांच्याकडे देण्यात आले होती. त्यावर चेअरमननी त्यांच्याशी संपर्क साधला. संस्थेच्या बाजूने अहवाल देण्यासाठी उंबरज्या आणि तीस हजार लाचेची मागणी केली. पहिला हप्ता म्हणून दहा हजार घेण्याचे मान्य केले. याबाबत लाच लचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर या विभागाने 15 एप्रिल रोजी पडताळणी केली.
बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा लावला असता दहा हजार रुपये लाच घेताना उंबरजे यांना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत उंबरजे यांच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.