बाबासाहेबांच्या शिक्षणात माणुसकीची शिकवण पण आज शिक्षणात धर्मांध शक्ती घुसली, शिक्षण हे भगव्या छायेखाली ; प्राचार्य दुष्यंत कटारे यांचे सडेतोड विचार
सोलापूर : डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात शिक्षणाला आणि मानव कल्याणाला महत्व दिले. त्याची शिक्षण पद्धती ही माणसाला माणूस म्हणून शिकवण्याची होती, पण आजच्या शिक्षण पद्धती मध्ये धर्मांध शक्ती घुसली आहे, हे शिक्षण हे भगव्या छायेखाली येत असताना त्याला विरोध होत नाही अशी खंत व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दुष्यंत कटारे यांनी व्यक्त केली.
सम्यक विचारमंच आयोजित मिलिंद व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प प्राचार्य कटारे यांनी गुंफले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक धोरणांची प्रासंगिकता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी डॉ प्रभाकर कोळेकर होते.
डॉ. कटारे म्हणाले, बिर्ला अंबानी शिक्षण समितीच्या अहवालात शिक्षण हे बाजारमुख झाले पाहिजे, विद्यापीठाची अनुदानित बंद करून खाजगीकरणाला चालना द्यावी, विद्यार्थी चळवळी बंद कराव्यात, केवळ सहा टक्के विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि वाणिज्य शाखेचे शिक्षण द्यावे, त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी हे व्यापाऱ्यांचे असले पाहिजे आणि उर्वरित 94 टक्के विद्यार्थ्यांना केवळ कला शाखेचे शिक्षण द्यावे आणि त्यांना धर्मांचे रक्षण करणारे शिक्षण द्यावे. यावर आज आपण तुटून पडतोय परंतु, बहुजन शिक्षण पद्धतीचा काटा काढण्याची सुरुवात वाजपेयी सरकार पासून झाली त्याचे लोन संपूर्ण देशात पसरले आहे बाबासाहेबांच्या संविधानातील शैक्षणिक पद्धतीची चौकट खिळखिळी करण्याचा प्रयत्न सुरू असून हा धोक्याचा इशारा आहे, मानवी अस्तित्व मुल्यहीन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.