सुशीलकुमार शिंदे रात्री निवासस्थानी ; हा नेता करणार आज काँग्रेस पक्षात प्रवेश
सोलापूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय खेळी, डावपेच पाहायला मिळत आहेत. काँग्रेस पक्षात सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण लक्ष सोलापूर लोकसभा मतदारसंघात घातले आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी रात्री एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर सिमेंट कंपनीचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनुरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर लगेच गुरुवारी दुपारी कोगनुरे हे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे समजले.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून तयारी करत असलेले महादेव कोगनुरे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे, भाजपचे उमेदवार राम सातपुते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव कोगनुरे यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांचे महत्त्व राजकारणात वाढल्याचे पाहायला मिळाले. आता कोकणवर आहे आपली राजकीय भूमिका कधी घेणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.
दरम्यान बुधवारी रात्री काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी रात्री उशिरा त्यांच्या विजापूर रोडवरील निवासस्थानी भेट घेतली बराच वेळ या दोघांमध्ये चर्चा झाली. त्याचवेळी कोगनूरे यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाल्याचे समजते. गुरुवारी दुपारी चार वाजता काँग्रेस भवन येथे सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत कोगनूरे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.