शिवसेना शिंदे गटाचे सुजित खुर्द, अर्जुन सलगर सह पाच जणांवर सोलापुरात गुन्हा दाखल
सोलापुरात बेकायदेशीर जागा बळकावून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे सुजित खुर्द अर्जुन सलगरसह पाच जणांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विजयकुमार आराध्ये, केदार आराध्ये, अर्जुन सलगर, सुजित खुर्द, सुजित कोकरे आणि इतर पाच साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे.
रुपाली संदीप वाडेकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेले फिर्यादीच्या पतीचे हॉटेल जेसीबीने रातोरात पाडून पावसामुळे झाड पडल्याचं भासवून जागेचा ताबा मिळवला. याप्रकरणी फिर्यादीला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी आरोपी सुजित खुर्द याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सुजित खुर्द हा शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचा प्रदेश कार्यकारणी सदस्य आहे तर अर्जुन सलगर हे धाराशिव लोकसभेचा वंचित बहुजन आघाडीकडून 2019 सालचे उमेदवार राहिले आहेत. अर्जुन सलगर यांच्यावर एकूण 14 गुन्हे दाखल असून यापूर्वी खंडणी मागणे, बेकायदेशीर जागा बळकवणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.






















