सुभाष देशमुख महापालिके विरोधात आक्रमक ; अतिरिक्त आयुक्त व नगर अभियंत्यांना नोटीस काढा ; पालकमंत्र्यांचे आदेश
सोलापूर : दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोलापूर महापालिकेच्या कारभारविरोधात आक्रमक दिसून आले.
समांतर जलवाहिनी होत आली आहे पण कुठे साठवणार? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पाणी पुरवठा योजनांचे 28 कामे मंजूर त्याच्या प्रशासकीय मान्यता आणि वर्क ऑर्डर का मिळाल्या नाहीत? असाही प्रश्न उपस्थित केला. ऑगस्ट 2024 मध्ये शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत पण महापालिकेकडून अजूनही कामे झालेली नाहीत.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि नगर अभियंता सारिका अकुलवार यांना व्यवस्थित उत्तर देता आले नाही. अजून बऱ्याच कामांच्या प्रशासकीय मान्यता बाकी असल्याचे सांगितले.
या उत्तरावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नाराजी व्यक्त केली. बाजारात असल्यासारखे उत्तर देता का? तुम्ही महाराष्ट्रात राहता का? तुमच्या महापालिकेत वेगळे नियम आहेत का? येणारे 25 दिवस देतो पाणीपुरवठा योजनांची कामे करून घ्या अशा सूचना देत अतिरिक्त आयुक्त व नगर अभियंता यांना करणे दाखवा नोटीस काढा असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले.