दिलीप माने व धर्मराज काडादी हे माघार घेणार? शिवसेनेचे अमर पाटील काय म्हणतात…..
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. ही जागा काँग्रेस पक्षाची होती मात्र महाविकास आघाडी तयार झाल्याने दक्षिण मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला गेला. त्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजार समितीचे संचालक सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक अमर पाटील यांना उमेदवारी मिळाली.
त्यामुळे काँग्रेस पक्षातील दिलीप माने व लोकसभा निवडणुकीपासून राजकीय व्यासपीठावर आलेले धर्मराज काडादी यांनी आता बंडखोरी केली आहे. तसेच काँग्रेसचे बाबा मिस्त्री यांनीही काँग्रेसचा हात सोडून प्रहारची बॅट घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
अमर पाटील यांनी मागील अनेक दिवसांपासून दक्षिण मध्ये जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. दक्षिण मधील सर्वच गावांमध्ये दौरे करत नागरिकांशी संपर्क साधला आहे विधानसभेसाठी आपली मोट त्यांनी घट्ट बांधल्याचे पाहायला मिळाले. त्यांचे वडील रतिकांत पाटील यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे चांगली जाण या मतदारसंघाची त्यांना आहे.
या मतदारसंघात असलेला सर्वाधिक लिंगायत मतदार सध्या कोणाच्या पाठीशी राहायचे असा विचार करीत आहे परंतु अधिकृत उमेदवारी मिळाल्याने अमर पाटील यांचे पारडे जड वाटते त्यामुळे ऐनवेळी धर्मराज काडादी हे माघार घेऊन पाटील यांना पाठिंबा देतील असेही बोलले जात आहे.
सर्वांच्या नजरा दिलीप माने यांच्या भूमिकेकडे लागल्या आहेत. दिलीप माने यांनी दक्षिण लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दरम्यान अमर पाटील यांनी आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आपणाला आजही विश्वास आहे की धर्मराज काडादी आणि दिलीप माने हे दोनही नेते माघार घेतील आणि आपणाला पाठिंबा देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.