दक्षिण परीवर्तन विकास आघाडी उमेदवार देणार ; इच्छुकांचा ओढा ‘परिवर्तन’कडे वाढला
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे आता एका बाजूचे चित्र स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतून ही जागा कोणाला जाते हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराकडे लक्ष लागले आहे.
दोन्हीकडे असे चित्र असताना तिसरीकडे मात्र दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडी “है तयार हम” या भूमिकेमध्ये दिसून येते. यंदा काहीही करून दक्षिण परिवर्तन विकास आघाडी या विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार हे जवळजवळ निश्चित झाले असून दक्षिण मध्ये परिवर्तन घडवणारच असा निर्धार करण्यात आला आहे.
प्रस्थापित पक्षातून नाराज आणि संधी न मिळालेले कार्यकर्त्यांसाठी सोनई फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड यांनी दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली त्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते अण्णाप्पा सत्तूबर, भाजपचे जेष्ठ नेते श्रीशैल मामा हत्तुरे, बंजारा समाजाचे युवा नेते भाजपचे कार्यकर्ते सचिन चव्हाण, उद्योजक मळसिद्ध मुगळे, आप्पासाहेब पाटील असे अनेक सर्व समाजातील कार्यकर्ते जोडले गेले आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतून अनेक कार्यकर्ते इच्छुक म्हणून समोर आले आहेत त्यामध्ये नाराज गट मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे परिवर्तन विकास आघाडीकडे इच्छुकांचा ओढा वाढत आहे.
या आघाडीचे प्रमुख युवराज राठोड यांनी यावेळेस परिवर्तन विकास आघाडी निश्चितच उमेदवार देणार अशी घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसह महाविकास आघाडी आणि इतर निवडणूक लढवणार अपक्षांसाठी हे धोक्याची घंटा मानले जात आहे.