



सोलापूर – जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे कुक्कुट पालन प्रशिक्षणाची तुकडी क्र. 2 चा समारोप झाला.
या समारोप कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ नवनाथ नरळे, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ बोरकर, सधन कुक्कुट विकास गटाचे पशुधन विकास अधिकारी डॉ.स्त्रेहंका बोधनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी 15 दिवस प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना संदीप कोहीनकर म्हणाले, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन फार उपयोगी आहे परंतु या व्यवसायाचे नेटके नियोजन करून व्यवसाय सुरू केल्यास निश्चित पशुपालकांना त्याचा अर्थार्जनासाठी फायदा होईल. यासाठी जिल्हा परिषद म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
डॉक्टर नरळे व डॉक्टर बोरकर यांनीही मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
डॉक्टर स्नेहंका बोधनकर यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एस पी माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यसाठी एस.पी. माने, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व श्री जमादार, परिचर यांनी परिश्रम घेतलेले आहे.