सोलापूर झेडपीच्या अधिकाऱ्यांनो तुम्ही आज बाजी मारलात ; उद्यापासून दिवस आमचाच ! जिल्हा परिषदेच्या क्रीडा महोत्सवाचे व्हिडिओ आणि छायाचित्र पहा
सोलापूर : सोलापुरात शनिवारी जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार एकमेकांसमोर भिडले. निमित्त होते जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचे. उद्घाटनाचा सामना जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध जिल्हा परिषद पत्रकार संघ यांच्यात झाला. अधिकारी संघाने पत्रकार संघावर मात केली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाने या क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे.
त्यानंतर नेहरूनगर शासकीय मैदानावर जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध पत्रकार संघ यांच्यात उद्घाटनाचा फ्रेंडली क्रिकेट सामना झाला. सामन्याच्या उद्घाटनावेळी प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या बॉलिंगवर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी जोरदार बॅटिंग केली. टॉस पत्रकार संघाने जिंकल्यावर कॅप्टन प्रशांत कटारे यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पत्रकार संघातर्फे कॅप्टन कटारे, अकबर बागवान, शेखर गोतसुर्वे, विनोद कामतकर, संदीप येरवडे, आप्पा पाटील, अमोल साळुंखे, मनोज भालेराव, इमरान सगरी, अविनाश गायकवाड यांनी जोरदार बॅटिंग केली. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष बळीराम सर्वगोड, राजकुमार सारोळे यांनी संघाला प्रोत्साहित केले. पत्रकार संघाने सात ओव्हरमध्ये 68 रन काढले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांच्या बॉलिंगवर संदीप येरवडे तर महिला बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या बॉलिंगवर कॅप्टन कटारे यांनी धुवाधार बॅटिंग केली.
जिल्हा परिषद पत्रकार संघाचे आव्हान अधिकारी संघाने एक ओव्हर व आठ गडी राखून संपुष्टात आणले. अधिकारी संघातर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव व कॅप्टन तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली विजय चौकार मात्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मारला. जिल्हा परिषदेत पत्रकार आणि अधिकारी यांच्या बऱ्याच काळानंतर असा सामना झाल्याने चर्चेचा विषय झाला आहे.