सोलापूर झेडपी जलजीवनचा कारभार सांभाळणार ‘सुनील नंतर संजय’ ; पदोन्नतीने आले धनशेट्टी
सोलापूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर दोनचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांची पदोन्नतीने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता पदी नियुक्ती झाली आहे.
जलजीवन योजनेच्या टेंडर घोटाळ्यावरून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची संभाजीनगरला बदली झाली होती. त्यानंतर हे पद रिक्त होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता पाटील यांची प्रतिनियुक्ती झाली होती. पण त्यानंतर त्यांनी पदभार सोडला. त्यामुळे दक्षिण सोलापूर विभागाचे उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंताचा अतिरिक्त पदभार देण्याचा सीईओ मनीषा आव्हाळे यांनी निर्णय घेतला.
दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी दिपाली देशपांडे यांनी एमजेपीतील अकरा उप अभियंताच्या पदोन्नतीने नियुक्ती जाहीर केल्या. त्यात पहिल्या क्रमांकावर संजय धनशेट्टी हे पदोन्नतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्त झाले आहेत. धनशेट्टी यांनी यापूर्वी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणून काम केले आहे. सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. दुहेरी पाईपलाईनचे कामकाज त्यांच्याच काळात सुरू झाले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक योजना त्यांनी मार्गी लावल्या. केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून साकार झालेल्या रे नगर पाणीपुरवठा योजनेचे कामकाज त्यांनी पाहिले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता मिळाल्यामुळे जलजीवनच्या कामाला आता आणखी गती येणार आहे.