प्रणिती शिंदे, विजय देशमुख, सीईओ जंगम यांच्याकडून सांत्वन ; स्मिता पाटील गहिवरल्या !
सोलापूर : हैदराबाद रोडवरील सिमेंटच्या बलकर या वाहनाखाली येऊन तब्बल तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी युनियनचे नेते विवेक लिंगराज यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. लिंगराज हे बोरामणी येथील आपल्या शेताकडून परतताना हा अपघात झाला. आज रविवारी दुपारी चार वाजता मोदी स्मशानभूमीमध्ये विवेक लिंगराज यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी दिली.

विवेक लिंगराज यांच्या मृत्यूची बातमी कळताच सोलापूर शहरात राहणारे जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तातडीने शासकीय रुग्णालयाकडे दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक तथा माजी नगरसेवक बाबा मिस्त्री हे सिव्हिल मध्ये दाखल झाले. त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख हे सुद्धा तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी नातेवाईकांची विचारपूस करत अपघातात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
लिंगराज हे जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन अधिकारी असल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती मिळतात तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अजयसिंह पवार, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सोलापूर शहरात जितके जिल्हा परिषदेचे कर्मचारी राहतात ते सर्वच हॉस्पिटलकडे तातडीने आले.
त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील या पती धैर्यशील पाटील यांच्यासह सिव्हिल मध्ये आले. त्यांनी लिंगराज यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी सांत्वन करताना स्मिता पाटील यांचेही डोळे पानावले आणि त्या गहिवरल्या.
काही वेळाने खासदार प्रणिती शिंदे या दाखल झाल्या. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले.

घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची सांगत जड वाहतुकीबाबत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा अन्यथा असे अपघात होत राहतील आणि निष्पापांचे बळी जातील असे सांगताना मृतांना श्रद्धांजली वाहिली.
रात्री साडे अकराच्या सुमारास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सिविल हॉस्पिटल मध्ये येत लिंगराज यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापुरात फोन करून माहिती घेत घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचे सांगितले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, जिल्हा ग्रामीण नियंत्रणाचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले, जिल्हा कृषी विकास अधिकारी हावळे या सर्वांनीच लिंगराज यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला.