सोलापूर झेडपीत पारदर्शकता ;
अनुकंपात १२४ जणांची समुपदेशनाने भरती
सोलापूर : जिल्हा परिषदेत गुरूवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत अनुकंपा पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. पारदर्शकपणे राबविलेल्या या प्रक्रियेत ११ संवर्गातून १२४ जणांना जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. अनुकंपा भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद सोलापूरचे पारदर्शक पाऊल पडल्याचे आता सर्वच स्तरातून बोलले जात आहे. या प्रक्रियेमुळे प्रशासनातील विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.
गुरूवारी सकाळ १० वाजल्यापासून यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी अनुकंपा पदभरतीसंदर्भातील समुपदेशन प्रक्रिया राबविली. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने 257 जणांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द केली होती.
प्रतिक्षा यादीमधील 140 उमेदवारांना गुरूवारी कागदपत्रांसोबत उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार उमेदवारांनी जिल्हा परिषदेत गर्दी केली. अनुकंपा तत्वावर भरती ही एक संवेदनशील प्रक्रिया असून, तिच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि न्यायाचा तत्वधाराच असणे आवश्यक असते. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेने संपूर्ण प्रक्रिया वर्तमानपत्र जाहिरात, अर्ज छाननी, सूची प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष समुपदेशन अशा टप्प्यांमधून पार पाडली. यामध्ये कोणतीही अस्पष्टता न ठेवता, अर्जदारांना संधी आणि माहिती दोन्ही समप्रमाणात उपलब्ध करून दिल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. सायंकाळी उशिरा ११ संवर्गातून १२४ अनुकंपा पदांची भरती अत्यंत पारदर्शक आणि न्याय पद्धतीने व समुपदेशनाच्या माध्यमातून यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
———-
यांनी केली प्रक्रियेसाठी मदत…
अनुकंपा भरती प्रकिया यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, सचिन साळुंखे, प्रदीप सगट, महेश केंद्रे, शिवाजी राठोड, सचिन मायनाळ, अरविंद सोनवणे, मोहित वाघमारे, संतोष शिंदे, तुषार इटकर, किरण जाधव, ऋषिकेश जाधव, इराण्णा भरडे, हनुमंत गायकवाड, कृष्णा आधटराव रोहीत शिंदे, गणेश वटवटे,आदम नाईक यांनी यशस्वी कामगिरी बजाविली.