सोलापूर झेडपीत शिट्टीच्या आवाजाने कपबशी फुटली ! परिवर्तनाचा बार उडालाच नाही
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एक च्या अतिशय प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये यंदा परिवर्तनच्या कपबशीला समर्थांच्या शिट्टीने फोडून काढले. परिवर्तनाचा बार उडालाच नाही. सभासदांनी पुन्हा समर्थ पॅनलवर संपूर्ण विश्वास ठेवत भरभरून मतदान करून अख्खे पॅनल निवडून दिले. या विजयामुळे लिंगराज यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. निवृत्त कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांची खंबीर साथ लिंगराज यांना मिळाल्याचे पाहायला मिळाले.
रविवारी झालेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीत 916 मतदारांपैकी 834 सभासदांनी मतदान केले. सहाय्यक उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी आबा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अनुसूचित जाती प्रवर्गाचा पहिला निकाल हाती आला. त्यामध्ये समर्थ पॅनलचे चेतन वाघमारे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि तोच ट्रेंड कायम राहिला आणि समर्थ पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार सुमारे साडेतीनशेच्या फरकाने विजयी झाले आहेत.
या पतसंस्थेच्या निवडणुकीत कर्मचारी संघटनेतील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एकीकडे विवेक लिंगराज तर दुसरीकडे अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे, अनिल जगताप ही टीम होती. यावेळी परिवर्तनाचे वारे जोरदार वाहत असल्याचा बोलबाला झाला, परंतु सभासदांनी सुमारे 80 टक्के मतदान समर्थ पॅनलला केले आणि एक हाती सत्ता मिळवून दिली.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी संघटनांमध्ये मागील काही महिन्यांपासून ‘नेता कसा असावा’ यावरून बरीच चर्चा पाहायला मिळाली. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे नेते विवेक लिंगराज यांच्या विरोधात लिपिक वर्गीय संघटनेचे नेते अविनाश गोडसे, कर्मचारी महासंघाचे राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, कास्ट्राइब कर्मचारी संघटनेचे नेते अरुण क्षीरसागर यांच्यासह सुमारे 21 संघटना असल्याचे बोलले जात होते. यंदा पतसंस्थेच्या निवडणुकीत निश्चित परिवर्तन होईल या चर्चेनेही जोर धरला होता. पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बराच गदारोळ झाला, अविनाश गोडसे, राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे यांनी चेअरमन लिंगराज यांना पतसंस्थेच्या खर्चावरून धारेवर धरले होते, त्या ठिकाणी अंगावर जाण्याचाही प्रकार झाल्याचे पाहायला मिळाले. त्या सर्वसाधारण सभेतील गोंधळाची पूर्ण जिल्हा परिषदेच्या वर्तुळात बराच दिवस चर्चा ऐकण्यास मिळाली. तोच फटका या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला बसला का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे.
1 विवेक लिंगराज – मुख्यालय
2 डॉ.शत्रुघ्नसिंह माने – मुख्यालय
3 विष्णू पाटील – बार्शी
4 सुरेश कुंभार – कुर्डवाडी
5 शहाजहान तांबोळी – पंढरपूर
6 शिवानंद म्हमाणे – मुख्यालय 4वर्ग
7 किरण लालबोंद्रे – मंगळवेढा
8 गजानन मारडकर – मोहोळ
9 श्रीधर कलशेट्टी – उत्तर सोलापूर
10 विशाल घोगरे – मुख्यालय
11 विकास शिदे – करमाळा
12 तजमुल मुतवल्ली द.सोलापूर
*महिला प्रतिनिधी*
1 मृणालीनी शिंदे अक्कलकोट
2 श्वेतांबरी राऊत माळशिरस
*इतर मागासवर्ग प्रतिनिधी*
1 विजयसिंह घेरडे – सांगोला
*अनु. जाती / जमाती*
1 चेतन वाघमारे – अक्कलकोट.
विजा /भज.
1 शिवाजी राठोड मुख्यालय