सोलापूरचा ‘नेता’ देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराला ; साहेबांनी दिला हा शब्द
सोलापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये भाजप महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार आहे. त्या विजयाचे शिल्पकार म्हणून भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. सोलापूर जिल्ह्यात सहापैकी पाच जागा या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत त्यामुळे भाजप हा जिल्ह्यातील मोठा पक्ष झाला आहे.
सोलापूर शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी या यशामध्ये वाटा उचलला आहे. त्यामध्ये माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्याही नावाचा उल्लेख निश्चित करावा लागेल.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी तर्फे अनंत जाधव हे इच्छुक होते. पक्षाचा कट्टर कार्यकर्ता असल्याने त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती पण पक्षाने देवेंद्र कोठे यांना संधी दिली आणि अनंत जाधव यांना थांबण्यास सांगितले. पक्षाचा आदेश आणि नेत्यांचा शब्द शिरसंवाद्य म्हणून अनंत जाधव यांनी या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसाठी शहर मध्य आणि शहर उत्तर या दोन विधानसभा मतदारसंघात आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली.
सोलापुरातील मराठा समाजाची मते भारतीय जनता पार्टीकडे वळवण्यात जाधव यांनी वाटा उचलल्याचे दिसून येते.
निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर अनंत जाधव यांनी आपले नेते देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुंबईमध्ये सत्कार केला. यावेळी पक्षाचा आदेश मानून जबाबदारी चोख बजावणारे जाधव यांना फडणवीस यांनी शाबासकीची थाप दिली आणि निश्चितच भविष्यकाळात पक्ष तुमचा जरूर विचार करेल असा शब्द फडणवीस यांनी दिल्याचे समजते.