सोलापूरचे स्थानिक इच्छूक उमेदवार दिलीप शिंदे दिल्लीत तळ ठोकून ; भाजप नेत्यांच्या भेटीवर दिला भर
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीकडून अनेक इच्छुक आहेत. सोलापूर लोकसभेसाठी भाजप कडून राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळते. यांच्यासोबतच इच्छुकांमध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते तथा दैनिक नालंदा एक्सप्रेसचे संपादक दिलीप शिंदे, बक्षी हिप्परगा गावचे सरपंच प्राचार्य विश्रांत गायकवाड, कॉन्ट्रॅक्टर मुगळे यांची नावे चर्चेत असून आता तर लिंगायत समाजाचे नेते, माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला असून त्यांच्याही नावाची चर्चा होऊ लागली आहे. तसेच माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह त्यांच्या कन्या कोमल साळुंखे या इच्छुक असल्याचे बोलले जाते.
यापूर्वी भाजपने मुंबईतील रहिवासी मूळचे अक्कलकोट तालुक्यातील एडवोकेट शरद बनसोडे यांना दोन वेळा उमेदवारी दिली, एकदा त्यांचा पराभव झाला दुसऱ्यांदा ते लाटेमध्ये निवडून आले पण त्यांना अपेक्षित काही करता आले नाही. दुसऱ्यांदा भाजपकडे उमेदवार नव्हता म्हणून बनावट जातीचा दाखला असलेल्या डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांना लोकांनी दीड लाख मतांनी विजयी केले. या पाच वर्षात पावणे पाच वर्षे तर या महाराजांनी आपले तोंड उघडले नाही त्यातच त्यांच्या बनावट दाखल्याचा मुद्दा ऐरणीवर येऊन भाजपाची पूरती बदनामी झाली.
त्यामुळे सोलापुरातून आता अनुसूचित जातीचा ओरिजनल उमेदवार द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरातील एका नेत्यांनी माध्यमांसमोर तशी मागणी केल्याचे पाहायला मिळाले.
स्थानिक संपादक दिलीप शिंदे हे सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राहिले आहेत. अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला आहे. सध्या ते दैनिक नालंदा एक्सप्रेस चालवतात. ते बौद्ध समाजाचे असून त्यांनी पक्षाकडे सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी केली आहे.
सध्या ते दिल्लीमध्ये असून नुकत्याच झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनाला त्यांनी हजेरी लावली. त्या ठिकाणी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सोलापूर लोकसभेसाठी बराच वेळ चर्चाही केली. आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबत ही सोलापूर लोकसभेबाबत चर्चा करताना दिसले आहेत.
सोलापुरातील स्थानिक भाजपचे जुने कार्यकर्ते, अनुसूचित जातीचा ओरिजिनल जातीचा दाखला असलेले दिलीप शिंदे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भारतीय जनता पार्टीने यंदा बोगस उमेदवार देण्याऐवजी ओरिजनल उमेदवार द्यावा या मागणीमध्ये दिलीप शिंदे हे पुरेपूर उतरतात. त्यामुळे पक्षाने माझा विचार करावा अशी अपेक्षा शिंदे यांनी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे लावून धरली आहे.