जिल्हाधिकारी आशीर्वाद ‘ ग्रेट फुल जॉब ‘ ; माढयात ‘सिंग इज किंग’ ; जिल्हा माहिती कार्यालयाचं ‘शंभर टक्के सोनं ‘
सोलापूर : यंदाची सतरावी लोकसभा निवडणूक प्रशासकीय दृष्टीने बऱ्याच कारणाने लक्षात राहणारी असेल विशेष करून सोलापूरच्या प्रशासनाला. दर लोकसभा निवडणुकीला अधिकारी बदललेले असतात पण त्याचे काम आठवणीत राहते.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय संवेदनशीलपणे हाताळली त्याबद्दल त्यांचे प्रशासनासह राजकीय वर्तुळातूनही कौतुक होत आहे. या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासनाने अनेक चांगल्या सुविधा केल्या होत्या. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप मार्फत जनजागृती करण्यात आली.
42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा, पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह, मतदाराकरिता सावलीची व्यवस्था, उष्माघातापासून बचावासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार ओआरएसयुक्त पाण्याचा पुरवठा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा, स्वयंसेवकांची नियुक्ती, महिला व जेष्ठ मतदारासाठी स्वतंत्र रांग, मतदान केंद्राचा परिसर व स्वच्छतागृह साफसफाई, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रासाठी भिन्न रंगाचा वापर, मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी मतदार मदत कक्षाची स्थापना या सुविधा देण्यात आल्या होत्या. सोलापुरात दिलेल्या या सुविधांमुळे नागरिकांनी प्रशासनाचे विशेष कौतुक केले.
एकूणच राजकीय परिस्थिती, देशातील निवडणुकीचे वातावरण पाहता तसे पाहायला गेल्यास ही निवडणूक सोपी नव्हती परंतु कमी वयात एवढी मोठी जबाबदारी पार पाडणारे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पद्धतशीरपणे या निवडणुकीचे योग्य नियोजन केले. मतदानाच्या दिवशी प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर ते स्वतः लक्ष ठेवून होते. त्यांनी स्वतःचे मतदान ही दुपारी चारच्या पुढे केले. प्रत्येक बाबतीत ते positive दिसले आहेत. एकूणच लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कामकाजाची पद्धत पाहता अधिकारी ‘कलेक्टर सर ग्रेट फुल जॉब’ असा शब्द वापरत आहेत. त्यांच्या जोडीला निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, विठ्ठल उदमले, सदाशिव पडदूने आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निर्हाळी यांची साथ महत्त्वाची ठरली.
प्रशासनाने मतदारांना दिलेल्या सुविधांचे कौतुक झाले मात्र मतदारांची नावे यादी मधून डीलेटेड झाल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी मागणी होत आहे.
माढा लोकसभा निवडणुक यावेळी अतिशय चुरशीची आणि लक्षवेधी ठरली. या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर होत्या. त्या सोलापुरात येऊन केवळ एका महिन्यातच त्यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची जबाबदारी आली. मात्र यापूर्वी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केलेल्या कामाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. महिला अधिकारी आणि त्या सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी त्यामुळे इतर पुरुष अधिकाऱ्यांना मर्यादा पडतात. पण ठाकूर या अतिशय मनमिळावू आणि दिलखुलास व्यक्तिमत्व असल्याने कोणत्याही अधिकाऱ्याला काम करताना अडचण जाणवली नसल्याचे ऐकण्यास मिळते. त्यांनीही या निवडणुकीचे अतिशय योग्य पद्धतीने नियोजन करत ही निवडणूक हाताळल्याचे दिसून येते. सांगोला आणि करमाळा मध्ये ईव्हीएम च्या बाबतीत झालेल्या दोन घटना वगळता ही निवडणूक अतिशय व्यवस्थित आणि शांततेत पार पडल्याचे पाहायला मिळाले.
लोकसभा -विधानसभा निवडणूक असली की, माध्यमांसाठी जिल्हा माहिती कार्यालयाची भूमिका महत्त्वाचे असते. यावेळी महाराष्ट्रात सर्वात प्रथम सोलापुरात मीडिया सेंटर कार्यान्वित करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या कामकाजाची पद्धत अतिशय व्यवस्थितपणे पाहायला मिळाली. यंदाच्या निवडणुकीत प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यासोबत आता सोशल मीडिया सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. निवडणुकीचे प्रत्येक अपडेट तितक्याच जलदपणे आणि अतिशय वेळेवर माध्यमांना मिळाले. यापूर्वी एखाद्या उमेदवाराने अर्ज भरल्यास त्याचा फोटो सायंकाळी पाचच्या नंतर मिळायचा परंतु यावेळी अर्ज भरल्याच्या पाचव्या मिनिटाला तो फोटो माध्यमांना मिळून जायचा, मतदानाची आकडेवारी सुद्धा वेळेवर मिळण्यास मदत झाली त्यामुळे माहिती कार्यालयाने हायटेक काम केले असून या विभागाला शंभर टक्के सोनं लाभल्याची चर्चा होत आहे.
स्वीप मार्फत प्रकल्प अधिकारी सुधीर ठोंबरे आणि मतदान केंद्र दुरुस्ती व सुविधा पुरवण्यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांचा रोल महत्वाचा ठरला आहे.