सोलापुरात जिल्हा प्रशासनाचे पदयात्रेतून शिवरायांना अभिवादन ; कलेक्टर, सिईओंनी केले पालखीचे सारथ्य
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 व्या जयंती उत्सव निमित्त केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा नियोजन भावनाच्या कार्यालयासमोर सकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय शिवाजी जय भारत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उप जिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते हाजी मलंग नदाफ यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे नेते मनीष देशमुख यांनीही उपस्थिती लावून उत्साह वाढवला.
सकाळी साडेदहा वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते झेंडा दाखवून पदयात्रेला सुरुवात झाली. सात रस्ता ते रंगभवन उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत हजारो विद्यार्थी, नागरिक यांची जय शिवाजी जय भारत पदयात्रेत सहभागी झाले होते.
रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील त्यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेचा समारोप झाला. यावेळी शिवजन्मोत्सवानिमित्त पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सीईओ कुलदीप जंगम या अधिकाऱ्यांनी पालखी खांद्यावर घेऊन पालखी सोहळ्यातील मावळ्यांचा उत्साह वाढवला.