सोलापूर काँग्रेसचे नजीब शेख पुन्हा राष्ट्रवादीत दाखल ; साहेबांच्या नाही पण दादांच्या
सोलापूरचे युवा नेते नजीब शेख यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मुंबईत पार पडलेल्या विशेष सोहळ्यात त्यांनी पक्षप्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, सोलापूरचे शहराध्यक्ष संतोष पवार, आणि शहराचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
काही दिवसांपूर्वीच नजीब शेख यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पुढे कोणत्या पक्षात सहभागी होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी अजित पवार गटासह शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना प्रवेशाची ऑफर मिळाल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं होतं. अखेर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
प्रवेशानंतर बोलताना नजीब शेख म्हणाले की, ‘अजित पवार यांची विकासाभिमुख भूमिका, निर्णयक्षम नेतृत्व आणि लोकांसाठी झटणारी वृत्ती पाहून मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राज्याला त्यांच्यासारखा कर्तबगार नेता लाभला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकहिताचे काम करणार आहोत.’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सोलापूरमधील मुस्लिम समाजात आणि युवकांमध्ये प्रभाव असलेल्या नजीब शेख यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादी अजित पवार गटाला स्थानिक राजकारणात नवं बळ मिळेल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.