सोलापूर : स्वच्छता ही सेवा मोहीम अंतर्गत 01 ऑक्टोबर 2023 रोजी तालुक्यातील सर्व गावांमध्ये “एक तारीख एक तास” या मोहिमे खाली स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. सोलापूर शहरात जिल्हा परिषदेने घेतलेल्या एक तास स्वच्छता मोहिमेत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः सहभाग घेतला. हातात झाडू घेऊन जिल्हा परिषदेच्या बाहेरील रस्ते त्यांनी झाडले, कचरा उचलला, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह वाढल्याचे पाहायला मिळाले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने रविवारी सकाळी झेडपीची छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान तसेच जिल्हा परिषदेच्या बाहेरचा परिसर झाडून कचरा उचलून स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील, कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, प्रशासन अधिकारी अनिल जगताप, सचिन जाधव यांच्यासह स्वच्छता विभाग ग्रामपंचायत विभाग पाणीपुरवठा विभाग सामान्य प्रशासन विभाग आरोग्य विभाग बांधकाम विभाग अर्थ विभाग तसेच उत्तर आणि दक्षिण पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. झेडपीच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या मोहिमेत केवळ नावाला सहभाग नोंदवला, शेवटपर्यंत त्यांनी हातात झाडू घेतल्याचे मात्र दिसून आले नाही.
विवेक लिंगराज, डॉक्टर एस पी माने, श्रीशैल देशमुख यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या निवासस्थानासमोरील परिसरातील वाढलेली सर्व झाडे तसेच कचरा उचलून स्वच्छता केली. यावेळी स्वच्छता करताना अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कडेलाच दारूच्या बाटल्या आणि गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या त्यामुळे “हे काय राव रस्त्यावरच” म्हणून नाराजी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी झेडपी अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना नागरिक आपले घर स्वच्छ ठेवतात परंतु कचरा बाहेर फेकतात, असे न करता हा जिल्हा, हा देश आपले घर आहे. त्याचा विचार करून कचरा बाहेर फेकू नका, सर्वत्र स्वच्छता ठेवा असे आवाहन केले.