“माझा पाठिंबा महेश कोठे यांनाच ; राष्ट्रवादीच्या नियुक्ती पत्र प्रदान समारंभात काय घडले
सोलापूर : माजी महापौर महेश कोठे हे शहर उत्तर मध्ये तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होईल. स्वतः शरद पवार हे कोठे यांना या ठिकाणी उमेदवारी देत आहेत. पण या मतदारसंघातून पुन्हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर मनोहर सपाटे यांना सुद्धा पुन्हा एकदा आमदारकीचे स्वप्न पडले आहे.
महेश कोठे यांना निवडून आणू असे म्हणणारे सपाटे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
बऱ्याच दिवसानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली त्यानंतर नव्याने निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
या कार्यकारणी मध्ये शहर उपाध्यक्ष पदावर महेश कोठे यांचे कट्टर समर्थक रियाज मोमीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपाध्यक्ष नियुक्तीचे पत्र पक्षाचे निरीक्षक शेखर माने शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या उपस्थितीत मनोहर सपाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याचवेळी मोमीन यांना डिवचताना स्टेजवरील काही पदाधिकाऱ्यांनी आता उमेदवारीसाठी मनोहर सपाटे यांना पाठिंबा द्या असे म्हणताच मोमीन यांनी “माझा महेश कोठे यांनाच पाठिंबा राहील” असे स्पष्टपणे उपस्थितांना सांगत आपले नेता प्रेम व्यक्त केले.
पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता म्हणून सोलापूर शहरात रियाज मोमीन यांची ओळख आहे. यावेळी रियाज मोमीन यांनी मनोगत व्यक्त करताना शरद पवार यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर महेश कोठे यांना निवडून आणले पाहिजे असे आवाहन केले.