सोलापूर ‘मध्य’ला लोकसभेनंतर विधानसभेत घडला तो प्रकार? ; ‘बोटाची शाई’ कुणाचा गेम करणार
सोलापूर : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही ‘भाई’जान लोकांनी एका विशिष्ट पक्षाला मॅनेज होत विशेष करून सोलापूर शहर मध्य या प्रणिती शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात झोपडपट्टी भागांमध्ये राहणाऱ्या मतदारांच्या बोटाला शाई लावून लक्ष्मी दर्शन घडवत मतदानापासून दूर ठेवले. त्यानंतर त्या ‘भाई’वर समाज तर नाराज झालाच मात्र ‘शेठ’ने सुद्धा बरेच दिवस दूर ठेवले.
तो प्रकार लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत ही आणि विशेष करून याच मतदारसंघात घडल्याने कुणाचा गेम होणार याची चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर बोटाला शाही लावून मतदानापासून दूर ठेवण्याचा प्रकार आता चांगलाच चर्चेचा झाला आहे. त्याचा फायदा निवडणुकीत उभे असलेले उमेदवार एकमेकांच्या विरोधात घेत असल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले या निवडणुकीत काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि एम आय एम हे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. काही पक्षातील कार्यकर्त्यांनी ‘बोटाला शाई’ लावण्याचा प्रकार सर्रास केल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार विशेष करून झोपडपट्टी भागातील मुस्लिम आणि पद्मशाली समाजात केल्याचे ऐकण्यास मिळत आहे.
हे प्रकार करण्यात काही ‘भाईजान ‘ आणि काही ठिकाणी ‘ भाऊ’ यांचा पुढाकार असल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीत तर एकाच पक्षाला मतदान होऊ नये म्हणून विरोधातील एकाने तर त्या पक्षाला मानणारी मते फोडण्यासाठी लक्ष्मी दर्शन घडवून दुसऱ्याच पक्षाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त केल्याची ही चर्चा आता ऐकण्यास मिळत आहे.
यामुळे ‘बोटाला शाई’ लावण्याचा प्रकार कोणाचा गेम करणार हे आता शनिवारीच स्पष्ट होईल. पण लोकसभा निवडणुकीनंतर हा धक्कादायक प्रकार आता यापुढे सर्वच निवडणुकांमध्ये वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या उत्सवाला मोठा धोका असून हा प्रकार करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी अशी ही मागणी काही जाणकार करत आहेत.