सोलापूर ‘शहर मध्य’ वर आता मुस्लिम समाजाचा अधिकार ; मतांच्या जोरावर आरिफ शेख यांचा दावा
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात यंदा एम फॅक्टर अतिशय महत्त्वाचा ठरला आहे त्यामध्ये मराठा समाज मुस्लिम समाज मागासवर्गीय समाज मोची समाज यांचा समावेश आहे परंतु मुस्लिम समाजाने दिलेली मते ही यंदा निर्णयक ठरली आहेत. त्यामुळे काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख यांनी आता शहर मध्य या मतदारसंघावर मुस्लिम समाजाचा अधिकार सांगत दावा केला आहे.
आरिफ शेख म्हणाले, देशात भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून मुस्लिम समाजावर झालेला अन्याय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलण्याचा जो प्रयत्न सुरू होता त्याच्या विरोधात मुस्लिम समाज पेटून उठला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा परफॉर्मन्स अतिशय चांगला राहिला आहे. सोलापुरात त्यांनी सभा घेऊन चांगले वातावरण तयार केले.
आमच्या ‘कुल जमात तंजीम’ या संघटनेच्या वतीने सोलापुरात वातावरण तयार करण्यात आले. मागील सहा महिन्यापासून मुस्लिम समाजाने ही मेहनत घेतली आहे. ज्यांची मतदार यादीत नावे नाहीत अशांची नाव नोंदणी केली. समाजातील युवक, नव्याने लग्न करून आलेल्या मुली यांची मतदार नोंदणी करून सोलापूर शहर जिल्ह्यात सुमारे चाळीस हजारापर्यंत नवे मतदार वाढवले आहेत.
सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिणचा शहरी भाग या भागातील मतदान पाहिले तर ज्या भागात मुस्लिम समाजाचे मतदार आहेत त्या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे यांना एक गठ्ठा मतदान मिळाले आहे. मुस्लिम ज्या ठिकाणी नाहीत अशा काँग्रेस नेत्यांच्या भागात मतांची आकडेवारी चिंताजनक आहे म्हणूनच प्रणिती शिंदे यांच्या विजयात मुस्लिम समाजाचा निश्चितच मोठा वाटा म्हणावा लागेल. त्यामुळे या समाजाला यंदा शहर मध्य मधून निश्चित उमेदवारी द्यावी मागणी आरिफ शेख यांनी केली आहे.