सोलापूर भाजपचे कार्यकर्ते ही म्हणू लागले प्रणिती शिंदेंना भावी खासदार
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. दुसरीकडे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी मात्र लोकसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले असून त्यांनी तशी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टी सोबत गेल्याने आता त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर आमदारही भाजपमध्ये जातील अशी चर्चा असून त्यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.
दरम्यान श्रीमंत मानाचा कसबा गणपती येथे श्री गणेश जयंती निमित्त शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
बाळीवेस कसबा गणपती परिसर हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागातील अनेक कार्यकर्ते हे भाजप समर्थक आहेत.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झालेल्या पूजेच्या वेळी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, खजिनदार केदार मेंगाणे, उत्सवअध्यक्ष शशिकांत बिराजदार, शिवानंद कोळकुर, मल्लिनाथ दर्गोपाटील, बिपिन धुम्मा, आनंद मुस्तारे, प्रवीण वाले, राहुल वर्धा, नागनाथ मेंगाणे, कुताटे यांची उपस्थिती होती. यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. व भावी खासदार म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.