सोलापूर – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ होत असल्याने ग्राहक इतर पर्यायांच्या शोधात आहेत. काही लोक इलेक्ट्रिक वाहने घेत आहेत तर काही सीएनजीची निवड करत आहेत. इलेक्ट्रीक कारचे जास्त पर्याय लोकांसमोर नाहीत, तसेच महागडेही आहेत. यामुळे लोक सीएनजी चारचाकी वाहनांकडे वळत आहेत.
सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांना चार चाकी मध्ये सीएनजी भरण्यासाठी शहरा बाहेर जावे लागत असायचे. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असल्याने नागरिकांचा कौल सीएनजी कडे ओढला जात आहे. सीएनजीच्या गाड्यांचे प्रमाण सोलापुरात जास्त आहे परंतु सीएनजी पंप नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती.
आता सोलापुरातील नागरिकांची प्रतीक्षा संपलेली असून आज दि. १५ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी नारायण टॉकीज शेजारी एमआयडीसी रोड जवळील पाटील नगर येथील गुरुकृपा पेट्रोलियम येथे सीएनजी पंपाचे उद्घाटन होटगीचे धर्मरत्न श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीएनजी पंप सुरू होत असल्याची माहिती मिळताच कार चालकांची गुरुकृपा पेट्रोलियम येथे मोठी रांग लागलेली होती.
यावेळी आयुक्त पी.शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, परिवहनचे सभापती जय साळुंखे, सिएनजीचे अधिकार निखिल जाधव, प्रशांत कुटे आदीजन उपस्थित होते.
















