सोलापूर : प्रेमसंबंधातून साखरपुडा झाल्यानंतर पुढे वाग्दत्त वधूवर वाईट संशय घेऊन तिचा खून केल्याप्रकरणी गोविंदसिंग प्रभाकर फटफटवाले (रा. उत्तर सदर बझार, सोलापूर) याच्यासह तिघांवर भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांचेसमोर होऊन न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याची हकीकत अशी की, मयत काजल गोरंदेवाले व आरोपी गोविंदसिंग फटफटवाले यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून काजल व गोविंदसिंग हे दोघे घरातून पळून गेले होते व काही दिवसांनी दोघेही सदर बझार पोलीस चौकी येथे स्वतः हजर झाले होते. त्यानंतर त्यांचा साखरपुडा करण्यात आला. साखरपुड्यानंतर काही दिवसांनी आरोपी गोविंदसिंग हा काजलच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तिचे अन्य परपुरुषाबरोबर प्रेम जुळले आहेत, अशा वाईट संशयाने गोविंदसिंग यास पछाडले होते. २७ जानेवारी २०१९ रोजी काजल हिस सिध्देश्वर यात्रेत फेरफटका मारून मौजमजा करून येऊ म्हणून आरोपी गोविंदसिंग याने त्याची आई विमल फटफटवाले व मित्र संतोष
गवळी यांना सोबत घेऊन काजल हिला घरातून नेले. परंतु आयकर भवनाच्या नजीक तिचा खून केला, असे सरकारपक्षाचे म्हणणे होते.
आरोपींनी काजल हिस घेऊन जातानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली होती. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करुन तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्रक दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपींचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आरोपींचा बचाव करताना घटनेतील सीसीटीव्ही कॕमे-याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीसी टीव्हीचा पुरावा विश्वासार्ह नाही तसेच सरकार पक्षाच्या साक्षीदारांच्या जबाबावर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे, केवळ संशयावरुन आरोपींविरुद्ध खोटा खटला दाखल करण्यात आला, असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. विकास मोटे, ॲड. सिद्धेश्वर खंडागळे यांनी तर सरकारतर्फे ॲड. शीतल डोके यांनी काम पाहिले.

















