सोलापूर : मागच्या आठवड्यात राज्यभरात ग्लोबल टीचर विजेते रणजित डिसले (Ranjit Disale) यांची परदेश वारीची रजा नाकारली म्हणून गोंधळ झाला, यात शिक्षण मंत्र्यांना दखल घ्यावी लागली मात्र डिसले गुरुजींनी एका वाहिनीला मुलाखत देताना जिल्हा परिषद कडून पैशाची मागणी केली जाते असा थेट आरोप केला होता. शेवटी रविवारी कामकाज सुरू ठेवत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने 153 दिवसांची रजा मंजूर केली. दरम्यान पैसे कोणी मागितले मानसिक व त्रास कोणी दिला, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी नोटीस जिल्हा परिषदेने ग्लोबल टीचर रणजित डिसले यांना दिल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Ceo Dilip Swami) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांना अमेरिकेतील फुलब्राईट संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. यातून डॉक्टरेटसाठी अमेरिकेत ऑगस्टमध्ये जाण्यासाठी संस्थेला जिल्हा परिषदेच्या परवानगीचे पत्र २५ जानेवारीपर्यंत सादर करणे आवश्यक होते. यासाठी डिसले यांनी केलेला अर्ज शिक्षण विभागाने दीड महिने प्रलंबित ठेवला पाठपुरावा केल्यावर मानसिक त्रास दिला व पैशाची मागणी करण्यात आली, असा आरोप डिसले यांनी प्रसारमाध्यमांमध्ये जाहीरपणे केला होता. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली व डिसले यांना तत्काळ परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे प्रशासनाने रविवारी कामकाज करीत त्यांना परवानगी दिली.
मात्र, मानसिक त्रास व पैशाच्या मागणीच्या आरोपामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. या आरोपाची गंभीर दखल घेत प्रशासनाने सोमवारी डिसले यांण्ना खुलासा करयाची नोटीस बजावली असल्याचे सीईओ स्वामी यांनी स्पष्ट केले. २२ डिसेंबर रोजी डिसले यांनी माढ्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे रजेचा अर्ज दिला. २३ डिसेंबर रोजी हा अर्ज शिक्षण विभागाकडे वर्ग करीत डिसले यांच्याकडेच देण्यात आला. त्यानंतर ३० डिसेंबरपर्यंत हा अर्ज डिसले यांच्याकडेच होता. ३१ डिसेंबर रोजी हा अर्ज शिक्षण विभागात दाखल झाला. सुट्या असल्याने ४ जानेवारीला आस्थापना विभागाला प्राप्त झाला. ५ जानेवारी रोजी त्रुटीच्या पूर्ततेसाठी ई-मेल व फोनवरून डिसले यांना कळविण्यात आले. ७ जानेवारी रोजी त्रुटींच्या पूर्ततेसाठी पत्र सहीला ठेवले. १३ जानेवारीपर्यंत कागदपत्रे न आल्याने स्मरणपत्र शिक्षण विभागाने पाठविले. त्यानंतर २० जानेवारी रोजी डिसले हे स्वत: जिल्हा परिषदेत आले होते, ही वस्तुस्थिती असल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले. यात विलंब कोठेच झाल्याचे दिसत नाही.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बजावलेल्या नोटिशीत पुढील मुद्दे उपस्थित केले आहेत. शिक्षण विभागाच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी आपणास कोणत्या विषयात, कधी व कशाप्रकारे मानसिक त्रास दिला. कोणत्या अधिकाऱ्याने पैशाची मागणी कधी व कशी केली. याबाबतची तक्रार माझ्याकडे किंवा वरिष्ठांकडे तोंडी किंवा लेखी स्वरूपात का केली नाही. राज्यपाल यांच्या दौऱ्यासंदर्भात ११ जानेवारी रोजी परितेवाडी शाळेला मी स्वतः भेट दिली व त्यानंतर सोलापुरात कक्षात बैठक घेतली. या दोन्ही वेळेस तुम्ही उपस्थित असताना रजेचा अर्ज व शिक्षण विभागात मानसिक त्रास दिला जातोय, पैशाची मागणी केली जातेय, याबाबत का सांगितले नाही.


















