सोलापूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महेश कोठे यांच्या निवासस्थानी भोजन करून गेले त्यांनी व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेश कोठे यांच्यावर महापालिकेची सर्वस्व जबाबदारी दिल्याने कोठे यांचे राजकीय वजन वाढल्याचे चित्र पाहायला मिळते.
त्यामुळे काँग्रेस, भाजप, शिवसेनेचे महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते महेश कोठे यांच्या संपर्कात आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या नंतर महेश कोठे यांनी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन आपला बालेकिल्ला असलेल्या विडी घरकुल परिसरातील संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये शनिवारी केले होते.
सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान हा फराळाचा कार्यक्रम होता मात्र ही वेळ जेवणाची असली तरी महेशअण्णा यांचा फराळ असल्याने परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि नेत्यांनी उपस्थिती लावली. महेश अण्णा यांचे सध्याचे राजकीय वजन पाहता सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची निश्चित गर्दी होणार हे निश्चित होते त्या पद्धतीने फराळ कार्यक्रमाला गर्दी झाली. सुधीर खरटमल यांचा हात धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधलेल्या चंदेले मॅडम सर्वात प्रथम आल्या, त्यांच्या सोबत माझी नगरसेविका बिस्मिल्ला शिकलकर माधुरी कांबळे हे कार्यकर्ते होते,
माजी महापौर मनोहर सपाटे, काँग्रेसचे नेते चेतन नरोटे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे हे एकत्र आले. फराळ खाताना महेश कोठे यांनी मनोहर सपाटे यांना फराळ भरवला, सपाटे हे सुद्धा गप्प बसले नाहीत त्यांनीही कोठे यांचे तोंड गोड केले. (भले ते एकमेकांना मनात काहीही म्हणत असतील) त्याच वेळी अमोल बापू यांचेही सपाटे साहेबांनी तोंड गोड केले.
दिलीप भाऊंची उशिरा एन्ट्री झाली. नंतर कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक तोफिक शेख, गटनेते किसन जाधव यांच्यासह अनेक नेत्यांची एकत्रित या कार्यक्रमाला इंट्री झाली. या स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये महेश कोठे यांनी तयार केलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा ऐकण्यास मिळाली हा बॅनर महेश कोठे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अनुषंगाने बनवला होता. कोठे यांचे शरद पवार प्रेम या बॅनर मधून दिसून दिले. मात्र त्यांनी आपले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत दुजाभाव केल्याचं दिसून आलं.
सुरुवातीला सुप्रिया सुळे, दुसऱ्या क्रमांकावर मोठ्या स्वरूपात शरद पवार त्याच्यापेक्षा लहान फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यानंतर जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे फोटो या बॅनर होते. सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत या बॅनरवर स्पष्टपणे दुजाभाव दिसत होता. जयंत पाटील आणि पालकमंत्री भरणे यांच्यामध्ये तेही ऐनवेळी बसवलेल्या स्वरूपात शिंदे साहेबांचा फोटो होता.
शिंदे साहेबांपेक्षा मोठे फोटो नगरसेवक देवेंद्र कोठे आणि नगरसेवक प्रथमेश कोठे यांचे होते. महेश कोठे यांनी कोणत्या उद्देशाने हा बॅनर केला की जाणीवपूर्वक असे केले का? याची कार्यक्रम स्थळी चर्चा होती. नगरसेवक देवेंद्र कोठे यांची या कार्यक्रमाला दांडी दिसून आली त्यांच्या सासूबाई महापौर श्रीकांचना यन्नम या मात्र आवर्जून उपस्थित होत्या. नगरसेवक प्रथमेश कोठे, रियाज मोमीन, वासुदेव इप्पलपल्ली यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

















