सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे यांची मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये अनपेक्षित पणे भेट झाली. हसापुरे हे आपल्या समर्थकांसोबत पत्रकारांशी बोलत होते तेवढ्यात काका साठे हे जिल्हा परिषदेत येत होते, पत्रकारांनी हसापुरे आणि काकांची भेट घालून दिली. काही दिवसांपूर्वी दिलीप माने यांच्या फार्म हाऊस वर हुरडा पार्टी झाली. या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व नेते उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आगामी जिल्हा दुध संघ, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती या बैठकीनंतर जिल्ह्याचे नेतृत्व ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे व माजी मंत्री दिलीप सोपल यांनी करावे असे ठरले. या बैठकीला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे नव्हते. त्यांची नाराजी हसापुरे यांना भेटल्यानंतर काका साठे यांच्या चेहऱ्यावर दिसत होती तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कारभाराची चौकशी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी लावली आहे त्यामुळे विजयकुमार देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणाचे पडसाद सोलापूरच्या राजकारणात उमटले आहेत.
त्याचही चित्र हसापुरे यांना पाहिल्यानंतर काका साठे यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं दरम्यान सुरेश हसापुरे यांनी यावेळी काका साठे यांना बोलताना एकवेळ बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही दोघे एकत्र येऊन पॅनल केले होते, आमचे उमेदवार 25-30 मतांच्या फरकाने पडले असे सांगत होते,तसेच माने यांच्या फार्म हाऊसवरील बैठकी मागील स्पष्टीकरण देताना जिल्हा दूध संघाची ही बैठक होती असे सांगितले तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन लढाव्यात असेही यावेळी बोलण्यात आले. बराच वेळ चर्चा होत असताना काका साठे यांच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता, हसापुरे बोलत होते काका फक्त मान हलवत होते पत्रकारांनी छेडले असता शेवटी साठे यांनी होय जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे दोन्ही नेते म्हणाले.


















