समाज कल्याणचे ‘शशी’ कपूर व देवा’नंद’ सापडले सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या तावडीत ; काय आहे गंभीर प्रकरण वाचा
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण मध्ये बराच गोंधळ आहे. अनियमितता दिसून येते. तत्कालीन समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे हा विभाग राज्यभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
आता मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या तावडीत दिव्यांग विभागाचा वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता आणि लेखा कनिष्ठ सहाय्यक सापडले आहेत. त्या दोघांची प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.
प्रकरण असे आहे, पंढरपूर येथील अंधशाळेचा विशेष शिक्षक महेश म्हेत्रे याला नव्याने सेवार्थ प्रणालीवर माहिती भरून विभाग प्रमुखाची कोणतीही मान्यता न घेता माहे मार्च 2024 ते माहे एप्रिल 2024 असे दोन महिन्याचे वेतन अदा केले आहे.
ही गंभीर बाब प्रशासनाच्या जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांनी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा शशी ढेकळे या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच संबंधित अंधशाळेच्या अध्यक्ष सचिवांना ही कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता विशेष शिक्षक महेश म्हेत्रे याची मूळ नियुक्ती दिनांक 1/9/ 2015 पासून असल्याचे दिसून येते. सदर पदास जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिनांक 13/7/ 2018 पासून मान्यता दिलेली आहे. त्या कालावधीपासून अजतागायत महेश म्हेत्रे याचे वेतन का काढण्यात आलेले नव्हते ही बाब संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. म्हेत्रे याची वैयक्तिक मान्यता, पदभरतीवेळी काढण्यात आलेली भरती संदर्भातील सर्व कागदपत्रे, ना हरकत प्रमाणपत्र व संस्थाकडून समाज कल्याण कार्यालयाकडे करण्यात आलेला पत्रव्यवहार, समाज कल्याण विभागाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आलेला पत्रव्यवहार, तसेच आयुक्त अपंग कल्याण यांनी पदभरती करण्यासाठी देण्यात आलेली मान्यता या सर्व पत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.
ही बाब जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी लावली असून प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे हे प्रकरण कार्यवाही करण्यासाठी पाठवले आहे. दरम्यान शशी कपूर आणि देवानंद यांची भ्रष्टाचाराची मिलीभगत कशी चालते वाचा पुढील भागात….