

“छोटा बच्चा जान के कोई ना समाजना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने निवडणूक अब की बार 75 पार हा दिलेला नारा तंतोतंत खरा ठरला आहे. या विजयाचे किंगमेकर, हिरो आणि शिल्पकार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे हे ठरले आहेत.
विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधान मतदारसंघात निवडून आल्यानंतर देवेंद्र कोठे हे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत ठरले. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांनी पदभार घेतल्यानंतर जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे हा त्रिकोण तयार झाला.
तेव्हापासून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीला सुरुवात झाली परंतु पक्षातीलच ज्येष्ठ आणि आम्हीच पक्षाचे मालक म्हणणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात खूपसू लागले त्यांनी इतरांसमोर बालक आमदार म्हणून हिणवत होते. पण काही करून या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय मिळवून आणायचा असा चंग गोरे, कल्याणशेट्टी आणि कोठे यांनी बांधला होता.
त्यासाठी भारतीय जनता पार्टीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेला फोडले. ज्या ठिकाणी भाजप कधीच निवडून आला नाही अशा ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसू लागले आहेत. ज्याने बालक म्हणून हिणवले त्यांना या भव्य दिव्य भाजपच्या विजयाने चांगलेच उत्तर मिळाले आहे.


















