सहा कोटींची फसवणूक प्रकरणात पुण्याच्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला
सोलापूर- नेहरू नगर व सलगर वस्ती येथील शेतजमीनीचे दस्तामध्ये परस्पर फेरबदल करून मोबदल्याची रक्कम न देता शेतजमीन स्वतः चे नावे लिहून घेऊन दोघां भावांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुल विष्णू लाड व राजेंद्र तुकाराम थोरवे दोघे रा.पुणे यांचा दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज मे.प्रथम न्यायदंडाधिकारी सो (विक्रमसिंह भंडारी) यांनी फेटाळून लावला.
यात हकिकत अशी कि,रघुनाथ आनंदा रोकडे यांच्या मालकीची नेहरु नगर येथील शेतजमीन गट नं १५/८ व संदीप गोविंद रोकडे यांच्या मालकीची सलगर वस्ती येथील शेतजमीन गट नं.१९/२/अ व १९/२/ब हि शेतजमीन दोघा भावांनी आरोपींना दि.१६/३/२५ रोजी रजिस्टर खरेदी दस्तान्वये लिहून दिली व सदर दस्त रजिस्टर कार्यालयात नोंद केल्याची झेरॉक्स प्रत त्याचदिवशी आरोपींनी फिर्यादीस दिली व फिर्यादीस मोबदल्यापोटी दिलेला धनादेश मुद्दाम पणे व जाणूनबुजून न वटविण्याकराता पेमेंट थांबविले तद्नंतर फिर्यादीने आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या सोबत संपर्क झाला नाही त्यावेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने कायदेशीर कारवाई करण्याकरिता रजिस्ट्रार कार्यालयातून दस्तांची नक्कल काढली असता त्यामध्ये आरोपींनी खरेदीखताची रक्कम देणे टाळण्यासाठी परस्पर वर नमूद मिळकतीबाबत दिवाणी दावा प्रलंबित असल्यास तो निकाली निघेपर्यंत रक्कम देणार नाही असा मजकूर फसवून समाविष्ट केल्याचे दिसून आले त्यामुळे फिर्यादीची आर्थिक फसवणूक करून जमीन बळकविल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध रघुनाथ आनंदा रोकडे व संदिप गोविंद रोकडे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झालेले आहेत.
दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती व पोलिस कोठडीत राहिल्यानंतर आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
यात मुळफिर्यादीतर्फे अँड. संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपींनी दोघां फिर्यादीची शेतजमीन रजिस्ट्रार दस्तान्वये स्वतः चे नावे लिहून घेऊन त्यामध्ये परस्पर बदल करून त्याबदल्यात दिलेला धनादेश मुद्दाम व जाणूनबुजून पेमेंट स्टाँप केला असल्याचे व रक्कम न देता करोडो रुपयांची जागा हडपल्याचे मे.कोर्टाचे निदर्शनास आणून दिले व आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना जामीन मंजूर होऊ नये या पुष्ठर्थ मे.सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे न्याय निर्णय दाखल केले. सदरचा युक्तिवाद व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मे.कोर्टाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
यात मुळफिर्यादीतर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड.राहुल रुपनर,अँड. शैलेश पोटफोडे यांनी व सरकार पक्षातर्फे अँड. अमर डोके यांनी काम पाहिले.