शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी होते. विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पदं मनोहर जोशी भूषवली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते.त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.
राजकीय कारकिर्द
1976 ते 1977 या काळात मनोहर जोशी मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले.
1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर ते लोकसभेत गेले.