माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा संवेदनशीलपणा ; भारतीय सैन्यातील जवानाला दिली व्हीआयपी ट्रीटमेंट
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार मागील दोन वर्षात चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. कार्यालयातील गर्दी, कर्मचाऱ्यांमागील बेशिस्तपणा, पूर्णवेळ अधिकारी नसल्याने ही हे प्रकार घडले परंतु आता सचिन जगताप यांच्या रूपात माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे. त्यांच्यामुळे या विभागाला काही शिस्त लागल्याचे चित्र पाहायला मिळते.
बुधवारी सायंकाळी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी होती. त्यात काही संघटनाही थांबून होत्या पण शिक्षणाधिकारी जगताप यांनी प्रत्येकांना बोलावून त्यांचे समाधान केले. अनेकांचे व्यवस्थित ऐकूनही घेतले. माध्यमिक शिक्षणा विभागाबाबत आक्रमक असणारी शिक्षक भारती ही संघटना सुद्धा काही विषय घेऊन जगताप यांच्यासमोर आली. केवळ तीनच मिनिटात या संघटनेचा विषय त्यांनी मिटवला जगताप यांच्या स्पष्टीकरणानंतर शिक्षक भारती सुद्धा समाधानी झाल्याचे पाहायला मिळाले.
याच दरम्यान एक युवक कार्यालयात आला त्याने आपले आयडेंटी कार्ड जगताप यांना दाखवले. ते कार्ड पाहताच जगताप यांनी त्यांना लगेच खुर्ची दिली आणि आपण बसा अशी विनंती केली. तो युवक सद्दाम नदाफ होता. भारतीय सैन्यातील सीनियर कॉन्स्टेबल असून सध्या त्याची ड्युटी पूंछ भागात आहे. आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आईचे नाव लावण्यासाठी त्या युवकाची धडपड दिसून आली. तात्काळ संबंधित लिपिकाला बोलवून जगताप यांनी कोणतीही अडचण न येता यांचे काम करून द्या, वेळ लावू नका, त्यांचा वेळ महत्त्वाचा असतो असे सांगून अतिशय व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. या घटनेमुळे शिक्षणाधिकारी जगताप यांच्यातील संवेदनशील पणा पाहायला मिळाला.