माध्यमिक शिक्षण विभाग शालार्थ आयडी फाईल पाठवेना ; शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू
भाषिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था असणाऱ्या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांचे विविध मागण्यासाठी एक मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे, प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण मंडळ मनपा सोलापूर तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी जि. प. सोलापूर व शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडून होणाऱ्या कार्यालयीन दिरंगाईमुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID यांसारख्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी सोलापूर जिल्हा परिषदेतील पूनम गेट येथे आमरण उपोषण सुरू केले.
या आमरण उपोषणास बालाजी लोकरे, विनायक बिराजदार, मंदार जोकारे, अमर पवार व नागनाथ गिराम हे शिक्षक बसले असून संस्थेतील इतर 34 शिक्षक हे चक्री उपोषण करत आहेत.
उपोषणकर्ते म्हणाले, अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या ढिम्म कारभारामुळे शिक्षकांचे कुटुंब देशोधडीला लागत आहेत. याच प्रकारच्या कार्यालयीन उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेली आहे. वर्षानुवर्ष अधिकाऱ्यांच्या टेबलावरून फायली हलल्या जात नाहीत. अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्त्यामुळे शिक्षकांना आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे.
सदरच्या उपोषणासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी, शिक्षक संघटना, विविध सामाजिक संघटना व पालकांनी या उपोषणासाठी पाठिंबा दिलेला आहे.