माध्यमिक शिक्षण विभागाचे आवक -जावक रजिस्टर आता ऑनलाईन ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी घेतला निर्णय, विभागात बरेच बदल होणार
सोलापूर : मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभाग बराच बदनाम झाल्याचे पाहायला मिळाले. त्याला कारणेही तसेच आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांची बदली झाल्यानंतर या विभागात शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगीत खुर्चीचा खेळ पाहिला मिळाला परंतु आता सचिन जगताप यांनी शिक्षणाधिकारी पदाचा सोमवारी पदभार घेतला आहे.
शिक्षण विभागातील आवक-जावक रजिस्टर वरून ही यापूर्वी बराच गोंधळ झाल्याचे ऐकण्यास मिळाले हाच विषय गांभीर्याने घेत शिक्षणाधिकारी जगताप यांनी आता थेट आवक जावक रजिस्टर ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून होईल असा मनोदय त्यांनी व्यक्त केला तसेच कार्यालयीन कामकाज सुद्धा आता ऑनलाईन केले जाणार असून त्यामुळे या विभागात पारदर्शकता येईल असेही ते म्हणाले.
आता महिन्यातील एक दिवसच सगळ्या संघटना यांची निवेदने त्यांचे प्रश्न तसेच वैयक्तिक गाऱ्हाणी, तक्रारी ऐकून घेणार यापुढे आता कार्यालयात भेटणाऱ्याची गर्दी होऊ नये यासाठी ही पद्धत अवलंबण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्हा गुणवत्तेत आणि प्रशासकीय बाबतीत राज्यात एक नंबर राहावा यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्टीत मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेऊन नियोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
मुख्याध्यापक सहीचे अधिकार द्यायला आठ दिवस का? आवक -जावक रजिस्टर वालाही मागतो चिरीमिरी
जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात चाललेल्या भ्रष्टाचाराचा खुद्द एका ग्रामीण भागातील पत्रकाराला चांगलाच अनुभव आला. ते पत्रकार एका खाजगी प्रशालेमध्ये शिक्षक आहेत. त्यांच्या प्रशालेतील एका मुख्याध्यापकाला सहीचे अधिकार देण्याचे मागणीचे पत्र त्यांनी पंढरपूर तालुका पाहणाऱ्या मस्के या लिपीकाकडे दिले. त्यावेळी शिक्षणाधिकारी जगताप यांची त्या पत्रावर सहीसाठी आठ दिवस लागतील असे सांगण्यात आले मुख्याध्यापकाला सहीचा अधिकार देण्याच्या पत्राला आठ दिवस का असा प्रश्न उपस्थित होतोय. यामागे निश्चितच भ्रष्टाचाराचा वास येत आहे तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील आवक जावक या टेबलला असलेला कर्मचारी सुद्धा प्रत्येक पत्र पाहून त्या पत्रानुसार रक्कम मागत असल्याचेही ऐकण्यास मिळते.