काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यासाठी लिंगायत चेहरा ; साहेबांचा समर्थक झाला जिल्हाध्यक्ष
सोलापूर : सुमारे वर्षभरापासून काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा सुरू असलेला गोंधळ आता संपला असून सोलापूरच्या अध्यक्ष पदावर काँग्रेस पक्षाने लिंगायत चेहऱ्याला संधी दिली आहे. ज्येष्ठ नेते आणि मागील अनेक वर्ष जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहणारे सातलिंग शटगार यांच्या गळ्यात पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली आहे.
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी महाराष्ट्रातील 13 अध्यक्ष पदांच्या निवडी जाहीर केल्या त्यामध्ये सोलापूर ग्रामीण साठी सातलिंग अण्णाराव शटगार यांची निवड झाली आहे.
जिल्हाध्यक्ष पदासाठी अशोक निंबर्गी यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळाली परंतु त्यांच्या नावाला बऱ्याच लोकांनी विरोध केल्याचे दिसून आले. तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाच्या कार्यपद्धती व नाराज होऊन लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला मदत केली होती. त्यांनी पक्षाकडे थेट काँग्रेसच्या नेत्यांच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या. आपला राजीनामा त्यांनी पक्षाकडे दिला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरता पदभार ज्येष्ठ नेते एडवोकेट नंदकुमार पवार यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
पुन्हा या पदासाठी नंदकुमार पवार यांच्यासह पंढरपूरचे प्रकाश पाटील, उत्तर तालुक्यातील युवा नेते सुदर्शन आवताडे, विजयकुमार हत्तुरे ही नेते मंडळी इच्छुक होती. पण पक्षाने सातलिंग षटगार यांना संधी दिली आहे. षटगार हे अक्कलकोट तालुक्यातील असल्याने माजी मंत्री शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांचे मित्र आहेत. आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी षटगार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. या जिल्हाध्यक्ष पदाला कसा न्याय देतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.