सोलापूरात राजकीय नेत्याचा बेकायदेशीर गाळे बांधण्याचा ‘सपाटा’ ; पालकमंत्र्यांनी घातले लक्ष ; महापालिका करणार कारवाई
सोलापूर : हरिभाई देवकरण प्रशाला शेजारील गावडे मंगल कार्यालय मराठा मंदीरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधण्यात आलेले सर्व १५ अनधिकृत गाळे आठवडाभरात काढून घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
चार हुतात्मा पुतळा मागील चौपाटी येथील पावभाजी सेंटर, भेळ विक्रेते यांच्यासाठी हे गाळे बांधण्यात आले आहेत. हरिभाई देवकरण प्रशालेचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा रेफरन्स देऊन महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती. महापालिकेने गाळ्यांवर नोटीसा लावल्या आहेत.
सध्याची चार पुतळा येथील चौपाटी हलवण्यात येणार असल्याने त्यांना पर्यायी जागा म्हणून सोलापुरातील एका राजकीय नेत्याने या ठिकाणी रस्त्यावर कडेला गाळे बांधण्याचा सपाटा लावला होता. या जागेत पर्यायी चौपाटी उभी करण्याचे त्यांचा मानस असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही बाजूला शाळा असल्याने हरीभाई देवकरण प्रशालेला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे बेकायदेशीर गाळ्यांबाबत तक्रार केली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी महापालिकेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेने या प्रत्येक गाळ्यांवर नोटीस लावून सदरचे गाळे स्वखर्चाने काढून घ्यावेत अन्यथा महापालिका कार्यवाई करेल असा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. यामुळे सोलापुरातील या ज्येष्ठ राजकीय नेत्याची आता चांगलीच अडचण झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे गाळे बांधेपर्यंत शेजारच्या प्रशालेला कसे काय दिसले नाही असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.