अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अकलूज शाखेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांनी शंभराव्या नाट्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. सोलापूर मध्ये 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन होणार आहे. या नाट्यसंमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सोलापूरला शंभरावे नाट्यसंमेलन करण्याचा मान दिला आहे. हा सोलापूर येथील नाट्य परिषदेच्या सर्व शाखांनी आजतागायत केलेल्या कार्याचा गौरव आहे. सोलापूरचे नाट्यकाला क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. सोलापूरची नाट्य चळवळ गतिमान होण्यासाठी सोलापूरच्या रंगकर्मींनी मनापासून प्रयत्न केले आहेत असे गौरोद्गार त्यांनी काढले.
नाट्य संमेलनास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. तसेच सैराट फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिला नाट्यदिंडीत सहभागी होण्यासाठी कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला नाट्यसंमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे यांनी नाट्यसंमेलना विषयी सविस्तर माहिती सांगितली. यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांना सल्लागार नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी नाट्यसंमेलनाचे कोषाध्यक्ष दिलीप कोरके, कार्यालय प्रमुख जयप्रकाश कुलकर्णी, समन्वयक कृष्णा हिरेमठ, समन्वयक डॉ.रणजीत गायकवाड, कार्यवाह प्रशांत शिंगे, निवास व्यवस्था प्रमुख अनुजा मोडक, कार्यवाह किरण लोंढे, दिनेश जाधव, विठ्ठल मोरे आदि उपस्थित होते.