“आम्ही साऱ्या लय भारी” अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या मुलाखतीने रंगला महसूल विभागाचा महिला दिन
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत असणाऱ्या सर्व शाखांचे महिला व अधिकारी कर्मचारी यांचा महिलादिन निमित्त सत्कार तसेच कौतुक सोहळा कार्यक्रम सोमवारी नियोजन भवन मधील सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर, जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार, जिल्हा खनिकर्म अधिकारी मोनिका वर्मा, तहसीलदार उज्वला सोरटे, तहसीलदार सरस्वती शिंदे पाटील, तहसीलदार अर्चना निकम, तहसीलदार शिल्पा पाटील, तहसीलदार शिल्पा ओस्वाल यांच्यासह सर्व विभागातील महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सर्व महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या आकर्षण होते ते म्हणजे अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या मुलाखतीचे. निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार यांनी त्यांची मुलाखत घेतली. अपर जिल्हाधिकारी ठाकूर या उर्दू भाषेच्या अभ्यासक असून उर्दू कवयित्री आणि गझलकार म्हणून त्यांची ओळख आहे. फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्या ओळखल्या जातात.
आपल्या मुलाखतीत मोनिका सिंह यांनी उर्दू भाषेची आवड कशी निर्माण झाली याबद्दल सांगताना उपस्थित महिला अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांना त्यांनी उत्तम आरोग्याबाबत टिप्स दिल्या. अधिकारी महिलांना आपल्या कामासोबत घराकडे तसेच आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे असते अशा वेळेस आहार कसा असावा, व्यायाम कोणता करावा याबाबत ही त्यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली.