सोलापुरात एमआयएम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; लोकसभेच्या उमेदवारीला तीव्र विरोध
सोलापूर- सोलापुरातील एम आय एम पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारोव्ह सय्यद, महीला अध्यक्षा रेश्मा मुल्ला, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद, तौसिफ काझी यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामे दिले आहेत. यामुळे लोकसभा निवडणूकीत पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
सय्यद म्हणाले, सोलापूर शहर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पक्षाचे अध्यक्ष फारुख शाबदी व निरीक्षक अन्वर सादात यांनी मीडियासमोर सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उमेदवाराची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे ही गंभीर बाब असून धर्मनिरपेक्ष विचाराला काळीमा फासणारी आहे.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा कुठल्याही प्रकारचा सांख्यिकी अभ्यास व मतदारसंघाची जात निहाय स्थितीचा अभ्यास न करता उमेदवारी जाहीर करीत आहेत. वास्तव पाहता गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी व एमआयएम पक्षाची आघाडी होती. या आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर होते. अशा नावाजलेल्या दिग्गज उमेदवारास १ लाख ७० हजार मते पडून त्यांची डिपॉझिट जप्त झाली होती. आणि त्याचबरोबर मत विभागणीचा फायदा भारतीय जनता पक्षाला झालेला होता. त्यामुळे काँग्रेसच्या दिग्गज असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. वंचित एमआयएम यांची आघाडी असताना व दिग्गज उमेदवार असतानाही या मतदारसंघात यश आलेले नव्हते त्यामुळे आजच्या परिस्थितीत जातीय समीकरण पाहता एमआयएम पक्षाचा उमेदवार म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीत अप्रत्यक्षरीत्या मदत करण्यासारखे असल्याचा आरोप केलाय.