RDC मनीषा कुंभार, अमृत नाटेकर मुंबईला ; प्रमोद गायकवाड अकोल्याला ; अप्पर जिल्हाधिकारी पदावर प्रमोशन
सोलापूर : सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार व महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर या दोघांना प्रमोशनने मुंबईमध्ये पदस्थापना देण्यात आली आहे. भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांना अकोला जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी नियुक्ती मिळाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वने विभागामार्फत निवड सूची कार्य 2024- 25 उपजिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गात पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदी संवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर पदोन्नती व पदस्थापना देण्याचे आदेश शासनाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी मंगळवारी जाहीर केले.
यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना अप्पर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती देत मुंबईच्या उद्योग विभागाच्या मैत्री कक्षाकडे नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांना मुंबईच्या झोपडपट्टी प्राधिकरणचे सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे भूसंपादन अधिकारी प्रमोद गायकवाड यांची अकोला अप्पर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर शमा पवार यांना महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अभिनंदन केले आहे.